हिरवळ दिलासा महिला स्वयंसिध्द अभियानाची यशस्वी वाटचाल.
सामाजिक चळवळ ही लोकाभिमुख असावी तसेच समाजास नवीन दिशा देणारी असावी ह्या तळमळीने मा. किशोरभाई धारीया यांनी हिरवळ प्रतिष्ठानची स्थापना केली. 'व्यक्तिगत विकास' हे सूत्र प्रमाण मानून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदी विविध प्रांतांमध्ये हिरवळ प्रतिष्ठानने उल्लेखनीय कार्य करुन स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. ह्याच कार्यप्रवासातील एक उल्लेखनीय पाउल म्हणजे 'हिरवळ दिलासा' ची स्थापना!
महिलांना स्वयंनिर्भर व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचा ध्यास घेणाऱ्या या योजनेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष मा. किशोरभाई धारिया यांचे ३६ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक २४ ऑक्टोबर २००२ रोजीचा सुमुहूर्त साधून करण्यात आला. मा. किशोरभाईच्या असीम त्यागातून व तळमळीतून या लहानशा रोपट्याचा पसारा तीन वर्षात फ़ोफ़ावला. सन २००२ साली सुरू झालेल्या स्वयंरोजगार योजनेचे जाळे आजमितिस महाड - पोलादपुर या दोन्ही ताल्युक्यांत पसरलेले आहे.
महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांच्यात बचतीची सवय रूजविणे, त्यांना कुटूंबास आर्थिक हातभार लावणेसाठी व्यवसाय मार्गदर्शन करणे, व्यवसायासाठी लागणारे अल्प रक्कमेचे कर्ज परत फेडीची मानसिकता त्यांच्यात निर्माण करणे, हा या योजनेचा गाभा आहे.
महाड - पोलादपूर तालुक्यांतील रोजचे कामासाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी, एक प्रमुख व्यवस्थापक, एक लेखनिक व क्षेत्रीय कर्मचारी असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. सर्व क्षेत्रीय कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रामध्ये महिन्यातून किमान दोन वेळा भेटी देतात. महिलांच्या सभा घेतात, त्यांचेकडून बचतीची रक्कम वसुल करतात, घरगुती व्यवसायाबाबत चर्चा करतात, त्यांना त्या व्यवसायासंबंधी माहिती देतात, कर्जासंबंधी माहिती देतात, जुनी कर्जे वसुल करतात त्याचबरोबर महिलांच्या सभा घेवून त्यांच्या अडीअडीचणींबाबत चर्चा करतात. महिलांना बाह्य जगातील घडामोडींची माहिती सांगणे, वर्तमानपत्राचे वाचन करण्याची सवय लावणे, त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण करणे इत्यादी महत्वपूर्ण कार्ये करतात.
ग्रामीण भागातील महिलांना दुर्लक्षित घटक न मानता त्यांची स्वत:ची एक आत्मनिर्भर प्रतिमा बनविण्यास हिरवळ ने 'दिलासा' दिला आहे. महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी "हिरवळ दिलासा' कटीबद्ध आहे. हिरवळ परिवार दिवसागणिक वृद्धिंगत होत आहे.... आपले सर्वांचे हिरवळ परिवारात स्वागत!!! |